मंडणगड : प्रयोगशील शेतीतून आर्थिक स्वावलंबता निर्माण करणाऱ्या तालुक्यातील वडवली येथील सुरेश मोडकले व पत्नी सुनीता या शेतकरी दाम्पत्याने आपल्या अथक परिश्रमाने जंगल परिसरात निसर्गाच्या सानिध्यात आदर्श सेंद्रिय शेतीचा वस्तुपाठ घालून दिला आहे. वीस गुंठ्यांत २२ प्रकारची फळं, भाजीपाला लागवडीतून कमी जागेत जास्त उत्पादनाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे.
वडवली गावापासून चार किमी अंतरावर मंडपाठिकाणी देऊळ परिसरातील सोन्यात डोळ्यांना सुखावणारी शेती केली आहे. मुंबई सोडून १९९२ पासून गावी स्थायिक झालेल्या मोड़कले यांनी शेतात मातीतून मोती पिकवण्याचा निश्चय केला. वडिलोपार्जित शेतीचा वारसा मिळाला असून, बारमाही शेती करून आर्थिक पर्याय निर्माण केला. आपल्या चारही मुलांना उच्चशिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले. अथक मेहनतीने शेतीच्या जीवावरच कुटुंबाचा आर्थिक भार उचलत शेतीत काय आहे? असे म्हणणाऱ्यांना त्यांनी चपराक दिली आहे. रासायनिक खते टाळून फक्त शेणखत वापर व जीवामृत फवारणीला प्राधान्य दिले. त्यासाठी पाळीव जनावरे कायम सोबत ठेवली आहेत.
नांगरणी, शेणखत आणि दूध असा तिहेरी उपयोग त्यांना होतो. सध्या शेतात चार टप्प्यांत कलिंगडाची ठिबक सिंचनात लागवड केली आहे. सोबत कलिंगड, पावतार चवळी, मूग, उडीद, कुलोद, पेवाडी, काकडी, चिबूड, दुची, फरस बी वांगी, मिरची, टोमेटो, कोथिबीर, तूर, भेंडी, पालक, लालमाट, हिरवा माट, मुळा, भूईमूग, गोंडा, तेंडली, पपई, गवती चहापत,अननस, केळी, कारली, अळूवडी पाने, शेवगा, लिंबू असा विविध २२ प्रकारचा मिक्स भाजीपाला केला आहे.
कोन्हवली, देव्हारे व आजूबाजूच्या गावांत विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. दिवसभरात शेतावर येऊन भाजीपाला खरेदी केला जातो. १२०० मीटर लांबीच्या १६ एमएमच्या पाईपातून डोहाचा पाणी येथून नैसर्गिक उपलब्ध असणारे पाणी आणत तांबड मातीत पीक होत नाही, हे विधान खोटे ठरवले आहे. गवत, पालापाचोळा, भाताच्या कोंडा जमिनीत गाडून खतनिर्मिती करण्यावर त्यांचा भर असतो. जंगली श्वन, रानडुक्कर, केलटी यांचा उपद्रव असल्याने रात्रंदिवस शेतात राहावे लागत असून, बांधावर मचाण बांधून ते राहात आहेत. लागवड परिसरातात झाडांच्या फांद्या काटेरी वनस्पती, साड्या यांचे कुंपण घातले आहे.
चहूबाजूने घनदाट जंगलव्याप्त परिसर असल्याने जंगली रानडुक्कर, केलटी यांचा वावर आहे. शेतीरक्षणासाठी रात्रंदिवस शेतात राहावे लागते. तीस वर्षे शेतीत घाम गाळत असून, हिंस प्राण्यांचा वावर पाहता स्वरक्षणासाठी शस्त्र मिळावे, अशी मागणी केली जाते. – सुरेश मोडकले, प्रयोगशील शेतकरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 11/Feb/2025














