रत्नागिरीत 12 वी च्या परीक्षेला शांततेत प्रारंभ, पहिल्या दिवशी कोणताही गैरप्रकार नाही

◼️ कोकण बोर्डाची ७ भरारी पथके तैनात

रत्नागिरी : बारावीच्या परीक्षेला आजपासून (११ फेब्रुवारी) प्रारंभ झाला. आज पहिला पेपर इंग्रजीचा होता. कोकण बोर्डामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी ६१ केंद्रांवर २४ हजार ५४१ परीक्षार्थी बसणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर १६ हजार ०५४ विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ केंद्रांवर ८ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दरम्यान, पहिल्या दिवशी कोकण विभागीय मंडळात परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा प्रकार केल्याची घटना घडलेली नाही.

आज सकाळी ११ वाजता बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला सुरूवात झाली. पहिला पेपर दुपारी दोन वाजता संपला.

बारावी परीक्षेच्या काळात कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत यासाठी कोकण बोर्डाने ७ भरारी पथके तैनात ठेवली आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथकेही पाहणी करणार आहेत. दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिपळूणसारख्या संवेदनशील परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची नजर राहणार आहे. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Infigo eyecare

दरम्यान, बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रत्नागिरीतील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देऊन तपासणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 11-02-2025