लांजा : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
रुपेश महादेव गुरव (३१, रा. गोंडेखल गुरववाडी लांजा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडितेची तिच्या आईच्या फेसबुक खात्यावरून आरोपीशी ओळख झाली होती.
या ओळखीतून रुपेशने पीडितेला तुला विशाळगड फिरायला घेऊन जातो, अशी फूस लावली. त्याच्या आमिषाला बळी पडून पीडिता त्याच्यासोबत फिरायला जाण्यासाठी तयार झाली. त्यानंतर १ मे २०२३ रोजी आरोपीने पीडितेला देवरूख ते मार्लेश्वर फाटा येथील श्री देव सोळजाई मंदिर येथून आपल्या दुचाकीवरून कोल्हापूर येथील एअरटेल टॉवर माने कॉलनी करवीर येथील एका रूमवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
ही बाब पीडितेने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी देवरूख पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३६३,३७६ (२) (जे), ३७६ (३) आणि पोक्सो कायद्यांतर्गत ४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा देवरुख पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी १० साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला भा.दं.वि. कायदा कलम ३६३ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार दंड, ३७६ (२) (जे) मध्ये ७ वर्ष कारावास व २ हजार दंड, ३७६ (३) मध्ये २० वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंड तसेच पोक्सो ४ मध्ये २० वर्ष कारावास व ५ हजार दंड आणि पोक्सो ८ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार रुपये दंड अशी एकूण २० वर्ष कारावास आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १२ हजार दंड पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात मुख्य कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार वर्षा चव्हाण यांनी व पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी काम पाहिले. या खटल्यात काही साक्षीदार फितूर झाले होते. परंतु, पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय अहवालामुळे आरोपीला शिक्षा मिळण्यास मदत झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 12/Feb/2025














