चिपळूण : अखिल भारतीय मराठा महासंघाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. अॅड. शशिकांत पवार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात १३ व १४ फेब्रुवारी रोजी कीर्तन महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवांतर्गत गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान, सायंकाळी ६ वाजता पुरस्कार सन्मान सोहळा, रात्री ८ वाजता राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हभप कबीर महाराज अत्तार यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार, १४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान, सायंकाळी ६ वाजता प्रमुख अतिथी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत पुरस्कार सन्मान सोहळा, रात्री ८ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन होणार आहे.
या महोत्सवादरम्यान श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांना ‘मराठा समाज रत्न’, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम, माजी आमदार निशिकांत ऊर्फ नाना जोशी, मंदार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राजाराम शिंदे, माजी सभापती बाळासाहेब माटे आणि मराठा समाजाचे नेते स्व. केशवराव भोसले यांना ‘मरणोत्तर जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा भूषण पुरस्कारानेही अनेकांचा गौरव होणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष आप्पा खैर, हरिश्चंद्र गुजर, अनंत खैर, कपिल शिर्के, विजय चव्हाण, प्रदीप चव्हाण, शहराध्यक्षा प्रज्ञा मोरे, राम शिंदे, समीर जाधव यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:38 PM 12/Feb/2025














