रत्नागिरीतील वसतिगृहांची सुरक्षा ‘रेक्टर’ विनाच !

रत्नागिरी : सामाजिक न्याय विभागा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाजकल्याण विभागाची मुला-मुलींची दहा वसतिगृह असून या ठिकाणी वस्तीगृहात राहण्यासाठी असणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अवघे दहा पैकी फक्त तीन रेक्टर असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा सध्या वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकांच्या हाती आहे. रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याने, या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत समाजकल्याणतर्फे दहा हॉस्टेल चालवली जातात. यामध्ये रत्नागिरी कुवारबाव येथे मुला व मुलींसाठी वसतिगृह असून जेलरोड येथे मुलांसाठी एक आणि मुलींसाठी दोन वसतिगृह आहेत. राजापूर तालुक्यातील पाचल येथे मुलांचे एक, सावर्डे येथे मुलींचे एक, देवरुख येथे मुलांचे एक, चिपळूण येथे मुलगे व मुलींचे एक-एक तर मंडणगड येथे मुलांचे एक वसतिगृह सुरू आहे.

सध्या रायपाटण वगळता अन्य वसतिगृहात शिक्षणासाठी असणाऱ्या मुला व मुलींची संख्या मोठी आहे. शालेय, महाविद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची जबाबदारी रेक्टरवर असते. विद्यार्थ्यांची अडीअडचणी सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम रेक्टर करीत असतात.

मात्र जिल्ह्यात असणाऱ्या दहा वसतिगृहांपैकी फक्त तीनच ठिकाणी रेक्टरची पदे भरलेली असून, उर्वरीत सात पदे रिक्त आहेत. रायपाटण व रत्नागिरी जेलरोड येथील मुलांचे वस्तीगृह आणि कुवारबाव येथील मुलींचे वसतिगृह याठिकाणी रेक्टर कार्यरत आहेत.

मुलींच्या वसतिगृहात शक्यतो महिला सुरक्षा रक्षक असून, त्याच मुलींवर लक्ष ठेवून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत असतात. सध्या मुलींचे जेलरोड येथील वसतिगृह, सावर्डे, चिपळूण येथील वसतिगृहात रेक्टर नसल्याने हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यातही वसतिगृहात रेक्टरची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा आता सुरक्षा रक्षकांच्या हाती असल्याने पालकवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील वसतिगृहाच्या रिक्त असलेल्या रेक्टरच्या जागा भरण्यात याव्यात याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या जागा लवकरच भरल्या जातील. – दीपक घाटे सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 13/Feb/2025