खेड : एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या दाम्पत्याच्या घरी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुली राज्य शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेत समाविष्ट करण्यात येत असून यात तालुक्यातील ३८६ मुली गेल्या २ वर्षात पात्र ठरल्या आहेत. त्यातील १६० मुलींना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून बँक खात्यात प्रत्येकी ५ हजाराचा पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. यासाठी शासनाकडून ८ लाखाचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित २२६ लेकींच्या कागदपत्रांच्या पूर्ततेची प्रतीक्षा असून त्यानंतर तालुक्यातील सर्व लाभार्थी लेकींचे योजनेद्वारे भविष्य सक्षम आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.
तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना (पिवळा) व प्राधान्य कुटुंब (केशरी) शिधापत्रिकाधारक दाम्पत्याच्या घरी १ एप्रिल २०२३ नंतर १ किंवा २ मुली जन्मल्यास ती लेक ‘शासनाची ‘लाडकी’ मुलींच्या जन्मदर। वाढीवसह भविष्य ठरत आहे. लाडक्या लेकींपाठोपाठ तिची आई ‘लाडकी बहीण’ होण्यास मदत तर वडील ‘लाडका भाऊ’ ठरल्याने अनेक कुटुंबे शासनाकडून मिळणाऱ्या घसघशीत अर्थसहाय्यामुळे मालामाल होत आहेत. यात लेक लाडकीला टप्प्याटप्प्याने वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत १ लाख १ हजाराचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत तिच्या आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना महत्त्वाची ठरण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म. बा वि.) श्रीकांत हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली शिरीषकर यांच्यासह ३१७ अंगणवाड्यांतील २९७ अंगणवाडीसेविका आणि २६२ मदतनीस प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तालुक्यातील १० बीट पिंजून काढत आतापर्यंत पात्र ठरलेल्या ३८६ लेकींची शासनाने दिलेल्या मोबाईलमधील अॅपमध्ये नोंद केली आहे.
तालुक्यात पात्र ठरलेल्या ३८६ पैकी १६० लेकींच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्याने मुलींच्या जन्मानंतरच्या पहिल्या हप्त्याची प्रत्येकी ५ हजाराची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झाली आहे. लेक इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर अविवाहित असताना- ७५ हजार रुपये शासनाकडून मिळणार आहेत.
लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये आंबवली बीटमधील २० पैकी ६ लेकी, भरणेत ६० पैकी २९, फुरूस- ३१ पैकी ११, कोरेगाव ५१ पैकी २०, लवेल ४२ पैकी १८, लोटे ५८ पैकी २२, शिव- ५२ पैकी १६, तळे- २६ पैकी १४, तिसंगी ३२ पैकी २२ तर वावेमधील १४ पैकी २ लेकींचा समावेश आहे. तर उर्वरित २२६ पात्र ठरलेल्या लेकीच्या पालकांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने लेकींच्या खात्यात योजनेच्या पहिल्या हप्त्याचे अर्थसहाय्य शासनाकडून प्राप्त झालेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 13/Feb/2025














