साडवली : आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील जनता सत्तेच्या विरोधात जनहितासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच शिल्लक नसतील, त्यात सर्वाधिक नुकसान सामान्य जनतेचे होईल, याची नोंद आजच्या तरुण पिढीने घ्यावी, असे स्पष्ट मत गावविकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सत्तालोभी राजकारणावर बोलताना व्यक्त केले आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर खंडागळे म्हणाले, सत्तेत असणाऱ्या बलाढ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जनतेचा दबाव गट हवा, असं जनतेला वाटत असेल तर जनहिताच्या मुद्यावर लढणाऱ्या विरोधकांना जनतेने साथ द्यायला हवी. हे आगामी काळात न झाल्यास जनतेचा आवाज उठवणारे विरोधकच शिल्लक राहणार नाहीत. याचा सर्वात जास्त फटका सामान्य जनतेला बसेल. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे विरोधकांकडून हळूहळू कमी होईल, सत्तालोभी राजकारणाचा फटका हा जनतेला सहन करावा लागतो. परिणामी, जनतेने लोकांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहवे आणि सत्तेत बसलेल्या लोकांकडून कामं करून घ्यावीत. विरोधी पक्ष खंबीर नसेल तर जनतेचा आवाज शासनदरबारी कोण पोहोचवेल? असा प्रश्नही खंडागळे यांनी उपस्थित केला.
नागरिकांचे प्रश्न प्रलंबित
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी, एमआयडीसी विकास त्याचबरोबर शेतीक्षेत्रातील समस्या असे अनेक प्रशन जनतेला भेडसावत आहेत. या प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी लोकांकडून जनतेला हवी असल्यास सत्ताधाऱ्यांवर जनतेचा दबाव असणे गरजेचे आहे, असे खंडागळे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 14/Feb/2025














