गुहागर : शहरातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील १ हजार ८०० मीटर परिसरात पडलेले मोठे खड्डे गुरुवारी खडी व मातीने भरण्याचा अजब प्रकार ठेकेदाराने केला. यामुळे गुहागरवासीयांनी हे काम रोखले. डांबर व खडीने खड्डे भरण्याऐवजी ठेकेदाराच्या अजब प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कार्पेट करणारे राष्ट्रीय महामार्ग खडिमातीने खड्डे भरत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून १ हजार ८०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाळा संपून चार महिने होऊन गेले तरी सदर खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराने पूर्णता दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान खड्डे मोठे असल्याने त्या ठिकाणी कार्पेटच केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंताने दिले होते. मात्र, गुरुवारी खडी व मातीने खड्डे भरून त्यावर रोलर फिरवण्याचा अजब प्रकार शहरवासीयांना दिसून आला. दीपक परचुरे आणि सिद्धिविनायक जाधव यांनी हे काम रोखून धरले. हे काम थांबून डांबर व खडीने खड्डे भरून त्यानंतर कार्पेट करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली.
गुहागर शहरवासीय आक्रमक होत नाहीत. मात्र, एखाद्या गोष्टीचा कडेलोट झाला तर मात्र अधिक आक्रमक होतात. यामुळे राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदाराने गुहागरवासीयांचा अंत पाहू नये, अन्यथा रास्ता रोकोसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दीपक परचुरे यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 15/Feb/2025













