लांजा : बेनीनदी रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

लांजा : लांजा शहरातील गणपती मंदिर-कालभैरव मंदिर ते बेनीनदीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले असून, अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.

लांजा शहरातील गणपती मंदिर-काळभैरव मंदिर ते बेनी नदीपर्यंतचा रस्ता लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये असून, या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोठमोठे खड्डे, साईडपट्ट्या गायब झाल्या असून, रस्त्याची खडी वरती येऊन डांबर निघून गेले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. पूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

या मार्गावरून लांजा आगाराच्या लांजा-बेनिखुर्द वाडगाव एसटी बस फेऱ्या सुरू असतात. या मार्गापुढे लांजा गोविळ-दाभोळे साखरपा मार्ग जोडला असल्याने मार्गावरून दिवस-रात्री वाहनांची वर्दळ वाढली आहे. गणपती मंदिर ते बेनीनदी असा एक किमीचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून, याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे एका वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची त्वरित दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. लवकरच हा रस्ता वाहनचालक व प्रवासी व रस्त्याशेजारील लोकवस्तीला वाहतुकीस योग्य असा होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक व प्रवासी, वाहनचालकांची बाजू मांडून न्याय देण्याचे काम केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Feb/2025