जिल्ह्यातील ५० हजार तरुणांना रोजगार देणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : काजूवर आधारित प्रकल्प (लॉजेस्टिक पार्क) मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, दापोली या तालुक्यात आणण्याविषयी पाहणी सुरू केली आहे. तसेच राजापूरला नव्याने एमआयडीसी आणली जाणार असून त्यादृष्टीने तिथे पर्यावरणीय सिस्टिम विकसित केली जाणार आहे. असे सांगत रत्नागिरी जिल्ह्यातील ५० हजार युवक, युवतींना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील पन्नास हजार युवक, युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी ३० हजार कोटीचे प्रकल्प मंजूर केले गेले आहेत. ते प्रकल्प याठिकाणी सुरू व्हावेत यासाठी सर्वांनी सकारात्मकता ठेवली पाहिजे. आपला मुलगा मुंबईला जाऊन नोकरी करून दहा हजार कमविण्यापेक्षा इथेच राहून नोकरी करून ५० हजार कमवणार असेल तर ते कसे उपयुक्त ठरेल याचा विचार पालकांनीही केला पाहिजे.

लोटे येथील कोकोकोला कंपनीच्या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून तो ३ महिन्यात सुरू होईल. हा प्रकल्प साडेतीन हजार कोटीचा असून पहिल्या टप्प्यात १५०० कोटीचे काम पूर्ण केले आहे. रत्नागिरीत होऊ घातलेल्या संरक्षण विभागाच्या प्रकल्पाला परवानगी मिळालेली आहे. याविषयी संबंधित जागेजवळील शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल. राजन साळवी यांच्या शिदि शिवसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे शिवसेनेकडून मुंबईत बोलावण्यात आलेल्या बैठकीवर मंत्री सामंत म्हणाले, एखाद्या पक्षातील कार्यकर्ते दुसरीकडे गेले की डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करावे लागतात. त्यानुसार नवे पदाधिकारी नेमले जातात. मात्र, लांजा, राजापूरमध्ये नवे पदाधिकारी नेमल्यानंतर ते तिथेच राहतील की नाही याची काळजी घ्यावी.

राजापूर मतदारसंघातील मुंबईकर आमच्यासोबतच आहेत. त्यामुळे ठाकरे शिवसेनेकडून आयोजित केलेल्या बैठकितून नावीन्यपूर्ण काहीच घडणार नाही. जरी कोणी त्यांच्या बैठकीला गेलेच तर ते शरीराने तिकडे असतील पण मनाने आमच्याबरोबर राहतील.

Shanti real estate 1

ती त्यांच्या पक्षाची पॉलिसी
खासदार संजय राऊत यांच्या कोकण दौऱ्यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले, खासदार संजय राऊत कोकणात आले तर ती त्यांच्या पक्षाची पॉलिसी असेल. त्यांच्या पक्षाला खिंडार पडत आहेत. त्यामुळे ते राजापूर येथे येत असतील. त्यांच्यामुळे काहीच फरक पडणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 17/Feb/2025