कडवई : जीवनात यशाला कधीच शॉर्टकट नसतो. भावी आयुष्यात यशस्वी होताना स्वयं अध्ययन महत्त्वाचे आहे. महान व्यक्तिमत्त्वे यशस्वी झाली याचे कारण त्यांचा सराव, मेहनत, साधना आणि तपस्या. आजच्या काळात महत्त्वाचा अडथळा इंटरनेटवरील आभासी जग, याच्यात अडकलात तर पुढे जाणे कठीण होईल, म्हणून आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये झोकून देऊन अभ्यास करा, पुढील पाच ते सात वर्षांत यशस्वी नक्की व्हाल. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, असे आवाहन प्रा. मिलिंद तगारे यांनी केले.
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. भगवान नारकर म्हणाले, परीक्षेची भीती बाळगू नका. भीतीमुळे कोणतेच काम नीटपणे पार पडू शकत नाही. आरोग्याची काळजी घेऊन धैर्याने परीक्षेला सामोरे जा.
यावेळी वर्गशिक्षक समीर भालेकर व मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांचीही भाषणे झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा, शिक्षक व सहकारी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पर्यवेक्षक संतोष साळुंके, सौजन्या महाडिक, आशिष सरमोकादम, पालक-शिक्षक उपाध्यक्ष संदेश सागवेकर, सदस्य सचिन मांजरेकर, प्रियांका कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश कुंभार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद कडवईकर, सोमनाथ कोष्टी, आवासाहेब शेंडगे, शशिकांत किंजळकर, प्रदीप कानाल, सिध्दी सुर्वे, सूरज कदम, संतोष पुरोहित, संजय घोसाळकर, प्रशांत साळवी, अरविंद सुर्वे यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 17/Feb/2025














