खेडमध्ये अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शासकीय कामे रखडली

खेड : तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती डोंगरदऱ्यांनी व्यापलेली आहे. तालुक्यात ११४ ग्रामपंचायती आहेत व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची संख्या ८४ आहे. अनेक ग्रा. पं. अधिकाऱ्यांना दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळावा लागत असून दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची धावपळ होत असते. या धावपळीत काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अपघात होऊन गंभीर स्वरूपाच्या दुखापती देखील झाल्या आहेत तर या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार प्रभारी असल्याने कोणतेही काम वेळेवर करणे अधिकाऱ्यांना शक्य होताना दिसत नाही. अनेक महिला कर्मचाऱ्यांची घरी लहान मुलं असतात परंतु आपल्या मुलांना पुरेसा वेळ देण्यासाठी सवड कामाच्या धावपळीत महिला कर्मचाऱ्यांना मिळत नाही.

कर्मचाऱ्यांच्या अपु-या संख्येमुळे खेड तालुक्यात अनेक विकास कामे रखडले आहेत. पं.स.च्या कर्मचाऱ्यां प्रमाणेच महसूल व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी आहे. पंचायत समिती खेड येथे मागील चार महिन्यांपासून पुर्णवेळ गटविकास अधिकारी व जि.प. बांधकाम विभागात अभियंते नसल्याने खेड तालुक्यातील कोणतेही काम वेळेवर होत नाही.

सामान्य नागरीकांना वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात परिणामी आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. सध्या शासनाच्या ऑनलाईन मिटिंगांचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग नेहमीच ऑनलाईन मिटिंगांमध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे.

खेड तालुका हा विकसित तालुका आहे. येथे नेहमीच कोट्यवधी विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. परंतु विकास कामे करून घेण्यासाठी पुरेसा शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग लागतो हे सध्याच्या लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? खेड तालुक्यात मागील अनेक वर्षे सर्वच शासकीय विभागांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. लोकप्रधीनींधींनी तालुक्यात शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 17/Feb/2025