दापोलीत उत्पन्न दाखल्यांसाठी हेलपाटे

दापोली : दापोली तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या घरकुलांसाठी उत्पन्न दाखला आवश्यक असल्याने लाभार्थ्यांची उत्पन्न दाखले काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले वेळेत मिळत नसल्याने त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

तालुक्यात अनेक तलाठी कार्यालयात पूर्णवेळ तलाठी नाही. त्यामुळे प्रभारी तलाठ्यांकडे एक दिवसांचा कार्यभार आहे. अशावेळी नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. तर नागरिकांची गैरसोय होत आहे आणि आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. प्रभारी तलाठी असल्याने लोकांना पंधरा पंधरा दिवस दाखले मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. तर अन्य वेळेत प्रभारी तलाठी दापोली तलाठी भवन येथे दाखल्यांवर सही करण्यासाठी सहकार्य करत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तलाठी फोन उचलत नाहीत, दाखल्यावर कधी सही करणार हे सांगत नाहीत. कॅम्पमध्ये या करून देऊ, अशी उत्तरे तलाठ्यांकडून मिळत आहेत. या वर्षी ग्रामपंचायतींना केंद्रच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १०० टक्के घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्यामुळे या योजनेतील घरे ही या वर्षात पूर्ण होणार आहेत. कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळणार आहे त्या साठी लाभार्थ्यांची अन्य कागदपत्रांसह उत्पन्न दाखला मिळावा म्हणून धडपड सुरू आहे. मात्र, उत्पन्न दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने या बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

पूर्णवेळ तलाठी नेमण्याची मागणी
प्रभारी तलाठी यांच्याकडून वेळेत कामे होत नसल्याने तलाठी कार्यालयाला पूर्णवेळ तलाठी द्यावा, अशी मागणी दापोली तहसीलदार यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 18/Feb/2025