खेड-भरणे मार्ग दुरुस्तीसाठी २४ फेब्रुवारीला ‘भीक मागो’ आंदोलन

खेड : खेड-भरणे या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक करत आहेत. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी संकलन करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथे भीक मागो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबा निकम, राजन दांडेकर, इक्बाल फकी उपस्थित होते. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना जलालुद्दीन राजपूरकर म्हणाले, या रस्त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता पालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. बांधकाम विभाग दुरुस्ती करत नसल्याने त्यामुळे आम्ही कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत निधी संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 18/Feb/2025