चिपळूण : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन आणि व्याख्यान या समाजप्रबोधन कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाने सर्वपक्षीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणून ‘हम सब एक है’ हा महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा सामाजिक वर्तुळात होत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी चिपळूणचे सुपुत्र संदीप सावंत यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद दिले. यानंतर शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव घेण्यात आले. ह.भ.प. वाभळे महाराज, ह.भ.प. कबीर अत्तार महाराज यांचे कीर्तन तसेच सुदर्शन शिंदे व नामदेवराव जाधव यांच्या शिवव्याख्यानाचा समावेश होता. ह.भ.प. वाभळे महाराज आणि कबीर अत्तार यांचे सामाजिक कीर्तन लोकांच्या पसंतीला उतरले तर शिवव्याख्यानने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
या महोत्सवाचे विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघाने राजकारण आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मियांना व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आणले आणि ‘हम सब एक है’ असा संदेश या महोत्सवातून दिला. त्यामुळे या महोत्सवाची मोठी चर्चा आता सर्वत्र होत आहे.
चिपळूणमध्ये प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला सर्वसामान्य जनता, प्रत्येक घटकाने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळेच हे शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो, अशा शब्दात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 18/Feb/2025














