फणसवळे कोंडवाडी येथे भरदिवसा घरफोडी

रत्नागिरी : फणसवळेत भुरटी चोरी करण्यासाठी आलेल्या भुरट्या चोराच्या हातात घबाड लागल्याने त्याने 15 तोळे सोने आणि 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम भरदिवसा घरफोडी करून लंपास केल्याची घटना फणसवळे कोंडवाडी येथे घडली आहे.

रत्नगिरीत चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आंब्याच्या बागेसह शेतात मजुरीसाठी गेलेल्या शेतकर्‍यांची घरे हेरून आता घरफोडीसारखे प्रकार सुरू झाले आहेत. असाच एक प्रकार फणसवळे कोंडवाडी येथे घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप सोनू माने हे फणसवळे कोंडवाडी येथे राहतात. त्यांची पत्नी मनाली व मुलगा रोहन आणि त्यांची मुलगी असे एकत्र राहतात. मंगळवारी सकाळी सर्वजण कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. मुलगा एमआयडीसीत तर स्वरूप माने हे मजुरीसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. रस्त्यालगतच असलेले स्वरूप माने यांचे घर बंद होते. दुपारी 12.30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. एका खोलीत कपाट उघडून हाती काही लागतंय का हे पाहण्यासाठी कपाट अस्तव्यस्त केले. मात्र त्या कपाटात त्याच्या हाती काहीच लागले नाही.

स्वरूप यांच्या पत्नीने घरातील सर्व दागिने आणि मोलमजुरी करून कमावलेली पुंजी एका लोखंडी ट्रंकमध्ये दडवून ठेवली होती. या ट्रंकवर चोरट्याची नजर पडली. अज्ञात चोरट्याने घरातील कोयतीनेच ट्रंक फोडला. त्याचवेळी तेथे असलेली एक सुटकेसदेखील त्या चोरट्याने फोडली. फणसवळे गावात आजवर असा कधी प्रकार घडला नव्हता. कोणीतरी भुरटा असावा असे ग्रामस्थांचे म्हणणे असून भुरटी चोरी करण्यासाठी आलेल्या या चोरट्याच्या हाती घबाडच लागले. त्या ट्रंकमध्ये असलेले 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.

फणसवळेत घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून त्यांनी मनाली यांची फिर्याद घेतली. या फिर्यादीवरून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 19-02-2025