रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर..

वसमत : जुनोना रेल्वे स्टेशनजवळ अचानक रुळावर आलेल्या निलगाईस रेल्वेची जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, नीलगाय हवेत उडून थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर अडकली.

यामुळे अकोला- पूर्णा मार्गवारील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. निलगायला विद्युत वाहिनीवरून काढेपर्यंत रेल्वेसेवा ठप्प होती. ही घटना आज पहाटे घडली.

आज पहाटे पूर्णा-अकोला-पूर्णा रेल्वे अकोलाकडे मार्गस्थ होती. वसमत तालुक्यातील जुनोना रेल्वे स्टेशन परिसरात अचानक रुळावर आलेल्या निलगाईस रेल्वे इंजिनची जोरदार धडक बसली. जोरदार धडकेने नीलगाय हवेत उंच उडून समोरील रेल्वे विद्युत तारावर जाऊन अडकली. यामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली.

दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्याने क्रेनच्या साह्याने विद्युत वाहिनीवर अडकलेल्या निलगाईस खाली काढले. त्यानंतर पूर्णा येथून निघालेली रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली. परिणामी पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा अशी रेल्वे क्रॉसिंग हिंगोली येथे नियमित होते ती आज सकाळी बोल्डा रेल्वे स्टेशनवर झाली. तसेच या मार्गावरील रेल्वे गाड्या दिड ते दोन तास उशिराने धावल्या. यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यासोबतच लहान मोठे वन्यप्राणी देखील रेल्वेला धडकून जखमी होऊन मृत्यूमुखी पडत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 20-02-2025