NEET UG 2025: लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी NEET ची परीक्षा देऊन MBBS चा प्रवेश मिळवतात. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून MBBS करण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
परदेशातून वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी NEET UG पात्रतेची वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा नियम कायम ठेवला असून, विद्यार्थ्यांना परदेशी संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी NEET उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. 2018 मध्ये आलेल्या या नियमानुसार, परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याने भारतात वैद्यकीय सराव करण्यासाठी आवश्यक मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पात्रता नियमांची पूर्तता करणे अनिवार्य
हा नियम न्याय्य, पारदर्शक असल्याचे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. NEET UG साठी पात्र होण्याची आवश्यकता पदवी वैद्यकीय शिक्षण नियम, 1997 मध्ये विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्याव्यतिरिक्त आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
खंडपीठाने सांगितले की, आम्हाला नियमांमध्ये ढवळाढवळ करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, सुधारित नियमांच्या अंमलबजावणीनंतर जर एखाद्या उमेदवाराला प्राथमिक वैद्यकीय पात्रता प्राप्त करण्यासाठी परदेशी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तर तो देशांतर्गत वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या नियमांतून सूट मागू शकत नाहीत. यामुळे भारताबाहेर कुठेही सराव करण्याच्या त्यांच्या अधिकारावर मर्यादा येत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 20-02-2025
