चिपळूण : तालुक्यातील कुडप येथील घरफोडी प्रकरणातील अट्टल चोरट्याला शुक्रवारी येथील दिवाणी न्यायालयाने दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दिगंबर सुनील सुर्वे (३१, सावर्डे-काजरकोंड) असे शिक्षा ठोठावलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, १० एप्रिल २०२२ ला तालुक्यातील कुडप परिसरातील साईपार्क अपार्टमेंटमध्ये एक सदनिका फोडून त्यातून १९ हजारांचा मोबाईल, ३ हजाराचे घड्याळ व शर्ट पँन्ट असा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप अर्जुन गमरे करत होते. त्यावेळी चोरीला गेलेले
शर्ट-पॅन्ट हे दिगंबर सुर्वे हा परिधान करत असल्याचे लक्षात येताच त्याआधारे सुर्वे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली होती.
या चोरी प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गमरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शनिवारी या खटल्याचा निकाल देताना चिपळूण न्यायाधीश मयुरेश काळे यांनी दिगंबर सुर्वे याला कलम ४५७ व ३८० अन्वये प्रत्येकी एक वर्षाचा सश्रम कारावास अशी एकूण दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येक गुन्ह्यात २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसाची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेकामी सरकारी वकील सुरेखा पाटील यांनी काम पाहिले. तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक गमरे यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक आबा पाटील यांनी सहकार्य केले असून पैरवी कामकाज पोलिस नाईक मीनाद कांबळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 24/Feb/2025














