देवरुख : सप्तलिंगी नदीच्या काशी विश्वेश्वर घाटावर आरती उत्साहात

देवरुख : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर सप्तलिंगी नदीच्या काठावर जलमय भक्तिरसात न्हालेली गंगा आरतीच्या धर्तीवरील भव्य सप्तलिंगी आरती उत्साहात झाली.

काशी विश्वेश्वर घाटावर स्थानिक महिलांनी रांगोळी आणि पणत्यांनी घाटाचे आकर्षक स्वरूप खुलवले, ज्यामुळे संपूर्ण परिसर अलौकिक तेजाने झळाळून गेला. सप्तलिंगीच्या प्रवाहात जलदिव्यांची लखलखती प्रतिबिंबे भक्तांच्या हृदयात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारी ठरली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काशी विश्वेश्वर देवस्थान, परिसरातील नागरिक, तसेच क्रांती व्यापारी संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. पहिल्याच प्रयत्नात एवढ्या उत्साहाने आरती पार पडल्याने भविष्यात ही परंपरा अधिक भव्य स्वरूपात वाढावी, अशी सर्वांचीच भावना होती.

या पवित्र आरतीच्या निमित्ताने सप्तलिंगी नदीचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले. सप्तलिंगीच्या सान्निध्यात राहणाऱ्या नागरिकांनी नदी स्वच्छतेची शपथ घेतली आणि तिच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. उपस्थित भाविकांनी नदीमध्ये कचरा कमी करण्याचा संकल्प सोडला, जो परिसराच्या स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

या भव्य सप्तलिंगी आरतीत ५० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. महाकुंभ पर्वणी हुकल्याची खंत असलेल्या भक्तांसाठी सप्तलिंगीने ही सुवर्णसंधी दिली. नदी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपलीच आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात दृढ झाली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सप्तलिंगी काठावर जल, भक्ती आणि श्रद्धेचा मिलाफ पाहायला मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 27/Feb/2025