कोरे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वेळीच निकाली काढा : संतोषकुमार झा

रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न वेळीच निकाली काढा, अशा सूचना व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी कार्मिक विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडून सांगण्यात आले.

कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची कोकण रेल्वे बेलापूर मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी झा यांच्यासमवेत अर्थ संचालक राजेश भडंग, सीपीओ बाळासाहेब निकम, डेप्युटी सीपीओ पी. व्ही. साळगांवकर, संतोष चव्हाण, प्रभाकर हातणकर, प्रकाश नारकर, काशिराम टक्के, सुनील देवळेकर उपस्थित होते. कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या बैठकीत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मांडण्यात आले. त्या प्रश्नांबाबत कोकण रेल्वे अधिकारी थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ काढून धोरण अवलंबित असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी झा यांना सांगितले.

याबाबत झा यांनी तातडीने कार्मिक विभागाला सूचना देत कृती समितीचे सर्व प्रश्न वेळीच निकाली काढण्यास सांगितले. हे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविले जातील, असेही आश्वासन दिले. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, उर्वरित प्रश्नांविषयी बेलापूर येथील कार्यालयात पुन्हा बैठक घेऊन त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रुप डीच्या भरतीत अन्याय
ग्रुप डीमधील पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे. ही बाब कोकण रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. या निकालाविषयी व्यवस्थापकीय संचालकांकडे दाद मागणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 03/Mar/2025