रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांबरोबरच रत्नागिरी नगरपालिका शाळांमधील विद्यार्थीही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था (नासा) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) सफरीवर जाणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अठरा शाळांमधील ७विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी सोमवारी (ता. ३) परीक्षा घेण्यात येणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती जागृत व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा, इस्रोची सफर घडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली होती. सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थी पाठविण्यात येणार आहेत. रत्नागिरी नगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थीही गुणवंत असून त्यांना नासा, इस्रोची सफर घडविण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी पालिकेकडे प्रस्ताव दिला होता.
मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी नियोजनच्या निधीमधून तरतूद करावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. नासा, इस्त्रोच्या सफरीसाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षेचा फायदा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आहे. हा उपक्रम रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळांमध्येही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने १८ शाळांमधील ६९८ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. सोमवारी ही परीक्षा होणार असून, त्यासाठी १६ लाखांची तरदूत केली गेली आहे.
या परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्यावर, तर सातवीमधील दोन विद्यार्थ्यांना नासा दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. परीक्षेचे पेपर तपासल्यानंतर लगेचच निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या शाळांमधील निवडलेले विद्यार्थी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसोबत पुढील महिन्यात नासा, इस्रोच्या दौऱ्यावर जातील. निवड चाचणीच्या परीक्षेत विज्ञानावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. – एस. जे. मुरकुटे, नगरपालिका शाळा प्रशासन अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 03/Mar/2025














