सावर्डे : गोवा – मुंबई महामार्गावरील सावर्डे येथील प्रवासी मार्ग निवाऱ्याचा वापर प्रवाशांऐवजी खासगी विक्रेते करीत आहेत. या मार्ग निवाऱ्यासमोर खासगी वाहने उभी केली जात असल्यामुळे हा मार्ग निवारा नेमका कोणासाठी बांधला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला एस. टी. महामंडळ जबाबदार असून ग्रामपंचायतीनेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
महामार्ग चौपदरीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रवाशांच्या सोयीसाठी मार्ग निवारे बांधलेले आहेत. हे निवारे सेवा रस्त्याच्या बाजूला आहेत. एस. टी. बसेस या महामार्गावरून भरधाव जात असल्यामुळे प्रवाशांना महामार्गावरच उभे राहून बसची वाट पाहावी लगाते.
या बस गाड्या मार्ग निवाऱ्याच्या समोर उभ्या न राहता शंभर ते दीडशे मीटर दूर उभ्या केल्या जातात. परिणामी, प्रवासी मार्ग निवाऱ्याचा वापर करण्याऐवजी महामार्गावरच बसची प्रतीक्षा करत उभे राहतात. त्यामुळे रिकामे असलेले हे प्रवासी मार्ग निवारे आठवडा बाजारात येणारे खासगी विक्रेते करताना दिसतात. त्यांचे साहित्य त्या निवाऱ्याच्या इमारतीमध्ये ठेवले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना सावलीसाठी तिथे जाता येत नाही.
तसेच एसटी बसेस मार्ग निवाऱ्यासमोरच उभ्या राहिल्या तर प्रवासी मार्ग निवाऱ्याचा वापर योग्य कारणासाठीही होईल. त्याचा चुकीच्या कामासाठी वापर होणार नाही. तसेच खासगी वाहनेही तिथे उभी केली जाणार नाहीत. याकामी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एस. टी. महामंडळास तसे पत्र द्यावे, अशी प्रवासी व विद्यार्थी वर्गाची मागणी आहे.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. एस. टी. बस मार्ग निवाऱ्यासमोर उभी राहिली तर निवाऱ्यात काही काळ बसता येईल. या ठिकाणी एस. टी. सवलत पास मिळण्याचीही सुविधा प्रशासनाने दिली पाहिजे- पायल साळुंखे, विद्यार्थीनी, सावर्डे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 03/Mar/2025














