राजापूर : तळवडे येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण

राजापूर : पितांबरी कंपनी सुगंधी व समृद्ध कोकण विकास मंच आणि तळवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित मधाचे गाव-तळवडे येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव साकारले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात तळवडे हे निसर्गसंपदेने नटलेले गाव मधमाशी पालनासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी पाहणी करून दिला होता. उद्योगभूषण रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशीने युक्त २० पेट्या वर्षभर सांभाळून त्याचा पायलट प्रकल्प राबवला गेला. तो यशस्वी झाला.

जानेवारी २०२५ महिन्यात मधमाशी वाचवा या संकल्पनेवर आधारित पदयात्रा काढून लोकजागर करण्यात आला होता. त्यावेळी तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी यांनी सहकार्य केले त्याचा पुढचा भाग म्हणून लोकांनी पुढाकार घेऊन आम्हाला याविषयीचे शाखशुद्ध प्रशिक्षण हवे आहे, अशी मागणी सुगंधी व समृद्ध कोकण विकास मंचाकडे केली. त्यामुळे मधमाशी याविषयातील मास्टर ट्रेनर हेमंतकुमार डुंबरे यांनी ५ दिवसीय कार्यशाळा घेऊन उपस्थित प्रशिक्षणार्थीना वर्गातील तसेच शेतशिवारातील मधमाशीचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पार पडले असून प्रशिक्षणार्थीची लेखी परीक्षाही घेण्यात आली आहे.

मधाचे गाव करण्यासाठी मधमाशी पालनाचा पायलट प्रकल्प, खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांचा तळवडे येथील पाहणी दौरा, मधमाशी संवर्धनाची लोकजागर-पदयात्रा आणि इच्छुकांचा प्रशिक्षण कार्यक्रम अशा सर्व कार्यक्रमांची संकल्पना व संयोजन आदित्य गोळे यांनी केले असून हे सर्व काम राहुल प्रभुदेसाई, प्रदीप प्रभुदेसाई, कुंजन साळवी, वरद काजळे या पितांबरी कंपनीतील सहकाऱ्यांच्या साथीने आणि रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास गेले आहे.

Tava mahotsav

रत्नागिरी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी प्रशिक्षणार्थीना संबोधित केले. ग्रामपंचायत तळवडे यांनी मधाच्या गावाचा ठराव पारित केला असून पुढील टप्प्यात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादरीकरण होणार आहे. त्या नंतर महाखादीचे सभापती रवींद्र साठे यांचा शासकीय दौरा तळवडे येथे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 03/Mar/2025