मंडणगड आगारात शुक्रवारी प्रवासी राजा दिन

मंडणगड : मंडणगड एसटी आगारासंदर्भातील प्रवाशांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी मंडणगड येथे ७ मार्चला प्रवासी राजा दिनाचे आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे उपस्थित राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते असिफ खलपे यांनी सांगितले. मंडणगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात छोटे आगार असून, वरिष्ठ पातळीवरून या आगाराला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातून बाद झालेल्या बस या मंडणगड आगाराच्या माथी मारल्या जातात.

गेल्या काही वर्षात एसटीच्या ताफ्यामध्ये शिवशाही, शयनयान आसनी या प्रकारच्या बस दाखल झाल्या तसेच नव्या स्वरूपात लालपरी या प्रकारातील बस दाखल होत आहेत; मात्र मंडणगड आगाराला एकही बस दिली नाही. याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करूनही आगाराच्या कारभारात सुधारणा होत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर ७ मार्चला प्रवासी राजा दिन होत असून, या दिवशी मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 04/Mar/2025