Shimgotsav 2025: शिमगोत्सवाची धूम सुरू.. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1315 सार्वजनिक, तर 2854 खासगी होळ्या

रत्नागिरी : कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला मंगळवारपासून जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. गाव वस्त्यांमधील मांडावर होळ्यांचे विधिवत पूजन आणि महिला होम करण्यात आला. त्यानंतर ग्रामदेवतांच्या पालख्या सजून ग्रामदेवतांना रुपे लावण्यात आली आहेत. यावर्षी जिल्हात 1399 पालख्या सजणार असून 1315 सार्वजनिक ठिकाणी तर 2854 ठिकाणी खासगी होळ्या उभारण्यात आल्या आहेत.

मंगळवारी फाक पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावांत होळ्या उभ्या करुन शिमगोत्सवाची सुरुवात होते. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणे 4 मार्च फाल्गून पंचमी (फाक पंचमी) पासून या जल्लोषी उत्सावाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे.

आठ दिवसांनी होळ्यांचा होम झाल्यानंतर ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या पालख्या शिमगोत्सवादिवशी होळ्या घेण्यासाठी मंदिराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी पालख्यांच्या भेटीचा सोहळाही रंगतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 05-03-2025