चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने शहरात वार्षिक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. मात्र, आता पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील भोगाळे रस्ता, बाजारपेठ व बहादूरशेखपर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, यानंतर नगर परिषदेने आणखी पुढचे पाऊले उचलण्याची गरज आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. किंबहुना बहादूरशेख ते चिंचनाका आणि चिंचनाका ते पॉवर हाऊस या दरम्यानचा रस्ता रुंदीकरण करून दुभाजक असा टाकता येईल या दृष्टीने विकास करण्याची गरज आहे, तरच चिपळूण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिक येऊ शकतात, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
दरवर्षी चिपळूणमध्ये वर्षातून एकदा अहवाल देण्यापुरती अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. या कारवाईत हातगाडी व टपरीवाले सापडतात आणि त्यांची रोजीरोटी बंद होते. मात्र, या लोकांना न.प.ला पर्यायी जागा देण्यात अद्याप यश आलेले नाही. मध्यंतरी चिपळूणमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याने जोरदार अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली होती. या कारवाईत दुकानदारांनी केलेले कट्टे, पक्के बांधकाम, शेड, लावलेली लादी, पायऱ्या आदीदेखील तोडून काढण्यात आल्या होत्या व बाजारपेठेचा रस्ता पूर्ण मोकळा केला होता. त्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याने असे धाडस दाखविलेले नाही.
मात्र, या कारवाईनंतर रस्ता रुंदीकरणसंदर्भात नगर परिषदेकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही आणि पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण सुरूच ठेवले आणि मोकळे केलेले रस्ते पुन्हा एकदा अतिक्रमणांनी व्यापले गेले. पालिकेमार्फत चार दिवसांपूर्वी केलेली कारवाई ही तकलादू स्वरुपाची आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारपेठेसहीत एस. टी. स्टॅण्ड व मार्कडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. चिचनाका ते एस.टी. स्टॅण्ड या रस्त्यावर चोवीस तास वाहतूक सुरू असते. अतिक्रमणांमुळे एस.टी. गाड्या डेपोबाहेर येताना मोठी अडचण होते.
पादचाऱ्यांसाठी फुटपाथ उभारावा…
भोगाळे रस्त्यावरून स्टॅण्डकडे ये-जा करणारे अनेक पादचारी असतात. त्यांना साधा फुटपाथ देखील पालिकेने बांधलेला नाही. रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ असणे आवश्यक आहे. या बाबत पलिकेने तरतूद करणे गरजेचे आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर नगर परिषदेने तत्काळ रस्त्याचे डिमार्केशन करणे आवश्यक आहे. तसेच न.प.च्या अखत्यारित असलेला रस्ता चुना टाकून लाईनआऊट देणे गरजेचे आहे. त्याबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 05/Mar/2025














