संगमेश्वर : बेधुंद झालेला तळीराम चारचाकी चालवत संगमेश्वरात येत होता. त्याला ना स्वतःची शुद्ध होती ना गाडीचा कंट्रोल. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्याला संगमेश्वरमध्ये थांबवण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसात ‘त्या’ तळीरामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अरुंद जागा तसेच महामार्ग चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या अडचणीने वाहतुकीचा मोठा प्रश्न येथे निमांग झाला आहे. वाहतूककोंडी हा रोजचा विषय असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभाग त्याकडे लक्ष देत नाही. दररोज वाहतूककोंडीतून मार्ग काढताना पोलिस कर्मचारी मेटाकुटीस आहेत. सोमवारी रात्री वेगळ्याच प्रकाराला पोलिसांना सामोर जावे लागले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावर एक चारचाकी गाडी वेडीवाकडी नियंत्रण सुटल्याप्रमाणे चालली होती, कदाचित अपघात किंवा हिट अँड रनचा गंभीर प्रकारही घडण्याची वाढ शक्यता होती. महामार्गावरील हा थरार पाहून आजुबाजूचे सर्वचजण भीतीच्या छायेत होते.
या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मोठा अपघात होण्यापूर्वीच पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त लावला. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, हेडकॉन्सटबेल क्रांती सावंत, वाहतूक पोलिस रियाज मुजावर हे तिथे होते. त्यांनी बेधुंद अवस्थेतील त्या तळीराम चारचाकी चालकाला सप्तलिंगी पुलावर थांबवले.
रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून चालकाला बाहेर घेतले पोलिसही हैराण झाले. चालकाला बोलण्याची शुद्ध नव्हती. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्या चालकाला असेच पुढे सोडले तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन पोलिसांनी चारचाकीसह चालकाला ताव्यात घेतले. हा प्रकार सुरू असतानाच महामार्गावर चारही बाजूला वाहतूककोंडी झाली होती. वाहनांच्या सुमारे एक ते दीड किमीपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी चारचाकी चालक रोहन गणेश शिर्के याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.
पोलिसांची सतर्कता
संगमेश्वर पोलिसांनी तत्परतेने महामार्गावर थांबून वेळीच ती गाडी थांबवली; अन्यथा पुढे मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकाराला आळा बसला. त्याबबरोबर संगमेश्वर येथे झालेली वाहतूककोंडीही पोलिसांनी वेळीच दूर केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 05/Mar/2025














