रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण संपन्न- विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारे विज्ञान प्रदर्शन

रत्नागिरी : पद्मभूषण चरित्रकार डॉ.धनंजय कीर मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. याची आठवण म्हणून दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

या कार्यक्रमासाठी ‘सृष्टिज्ञान’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री प्रशांत शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कांदळवन प्रतिष्ठान मधील अधिकारी वैभव बोंमले यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास उपकेंद्राचे  स्था. उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे, प्रा. डॉ. प्रफुल्ल सावंत, प्रा. डॉ. पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आर. बी. शिर्के गुरुकुल हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षक श्री किरण सनगरे . तसेच नवनिर्माण महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Echelon prive

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि मुंबई विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर डॉ. पांडुरंग पाटील सहयोगी प्राध्यापक पर्यावरण शास्त्र यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख अतिथी प्रशांत शिंदे यांनी आपल्या प्रभावी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी असलेले नाते समजावून सांगितले आणि त्यांच्याशी संवाद साधला. प्रा तौफीन पठाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री. अभिनंदन बोरगावे उप कुलसचिव यांनी  यावर्षीच्या विज्ञान दिनाच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. विज्ञान प्रदर्शनाचे पर्यावरण विज्ञान विभागाचे उद्घाटन गुरुकुल ची विद्यार्थिनी शमिका सागवेकर हिच्या हस्ते करण्यात आले. इतर विज्ञान विभागाचे उद्घाटन उद्घाटन श्री प्रशांत शिंदे डॉ प्रफुल्ल सावंत आणि श्री बोरगावे यांच्या हस्ते करण्यात आले. उपकेंद्राच्या विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्र, जीव शास्त्र, हवामान मोजण्याची उपकरणे, कोकणातील जैवविविधता आणि सागरी प्रजातींवर आधारित विविध प्रकल्प सादर केले. प्रदर्शनात उपस्थित सर्व विद्यार्थ्याने विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली आणि शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमासाठी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच उपकेंद्रातील एम.एसी पर्यावरण शास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र च्या सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्रा. ऋजुदा जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावणात आणि प्रेरणादायक ठरेल अशा पद्धतीने पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 05-03-2025