रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अशोक भुस्कुटे

वाटूळ : जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या अध्यक्षपदी समितीचे उपाध्यक्ष अशोक विठ्ठल भुस्कुटे (चिपळूण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अशोक भुस्कुटे यांची नियुक्ती करण्यात आली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्याने त्यांनी दिव्यांग समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते.

अशोक भुस्कुटे यांच्या नियुक्तीनंतर जुनी सर्व कार्यकारिणी बरखास्त करून, नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष विजय कदम (आरवली), सचिव सादीक करीम नाकाडे (रत्नागिरी), उपाध्यक्ष संजय सुर्वे (लांजा), खजिनदार दीपक नारायण बाईग (शिपोशी) यांची निवड करण्यात आली.

भविष्यात दिव्यांग समन्वय समिती, रत्नागिरी, प्रहार संघटना व जिल्ह्यातील सर्व स्थानिक दिव्यांग कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे काम करतील, असे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी व दिव्यांग समन्वय समिती अध्यक्ष अशोक भुस्कुटे यांनी यावेळी सांगितले.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 05/Mar/2025