अबू आझमींविरोधात खेडमध्ये शिवसैनिक आक्रमक

खेड : येथील तहसीलदार व खेड पोलिस ठाणे कार्यालयाच्या आवारात मंगळवारी ४ रोजी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करत हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या अबू आझमर्मीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी खेड तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आली.

दोन्ही विषयांचे निवेदन खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना देण्यात आले. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण म्हणाले, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मीक कराड आणि त्याच्या सराईत गुन्हेगारांनी केल्याचा आरोप आहे. या घटनेचे फोटो सध्या महाराष्ट्रात व्हायरल झाले आहेत. या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. तसेच जीव घेणारा प्राण घेणारा मुस्लिम शासक औरंगजेब याच्या विषयी आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनातील मागण्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, माधवी बुटाला, राजेश बुटाला, सतीश चिकणे, भूषण चोखले यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थिती होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 06/Mar/2025

Arihant 4