दापोली : अवजड वाहतुकीच्या ओझ्याने मांदिवली पूल दबणार?

दापोली : मांदिवली परिसरातून सुरू असलेल्या मायनिंगची वाहतूक आता येथील सार्वजनिक सुविधांच्या मुळावर उठलेली दिसत आहे. तेथील भारजा नदीवरील पुलाची अवजड वाहतुकीची क्षमता नसतानाही या पुलावर रोज शेकडो डंपर वाहतूक करत आहेत.

या प्रकाराबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. मात्र, नागरिकांच्या या तक्रारी जिल्हा प्रशासन विचारत घेताना दिसत नाही. येथील निसर्ग संपदा टिकून रहावी आणि या मायनिंगच्या त्रासातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून येथील ग्रामस्थांनी उपोषण या सारखे मार्ग अवलंबिले होते. मात्र, या नंतर शासनाने कारवाईचे नाचविलेले कागदी घोडे व्यर्थ ठरले आहेत, असा आरोप येथील नागरिक प्रशासनावर करत आहेत.

दापोली आणि मंडणगड या दोन गावांना जोडणारा भारजा नदीवरील हा एकमेव पूल आहे. कित्येक वर्षे जुना पूल असल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे आवश्यक आहे.

बांधकाम विभागाच्या माहितीनुसार या पुलाची १८ मेट्रिक टन इतकी वाहतुकीची क्षमता आहे. पण, प्रत्यक्षात मात्र या पुलावरून २५ मॅट्रिक टन बाहतूक सुरू आहे. पुलाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. मात्र, या बाबत जिल्हा प्रशासन जागरूक होताना दिसत नाही. दोन तालुक्यांना जोडणारा मांदिवली पूल हा महत्त्वपूर्ण पूल असल्याने या पुलावरून नागरिकांसह पर्यटकांची ये-जा असते. मात्र या पुलावरून आणि या मार्गावरून क्षमताबाह्य होत असलेली डंपरची वाहतूक अनेकवेळा वाहन चालकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात या पुलावरून पर्यटकांची संख्या मंदावली आहे.

स्थानिक पर्यटन बुडाले तरी चालेल, पण मायनिंग जागची हलली नाही पाहिजे, असा पवित्रा जणू शासनकर्त्यांनी घेतला आहे, असे एकंदरित चित्र मांदिवली परिसरात बनले आहे.

रोजगाराच्या नावाखाली मायनिंगचा धंदा…
रोजगाराच्या नावाखाली येथे सुरू असलेला मायनिंगचा हा गोरख धंदा येथील सामान्य नागरिकांना उध्वस्त करत असून धनदांडग्यांच्या दहशतीचा निवारा बनला असून आता तरी जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा शाबूत राहतील, या साठी तरी कारवाईची पावले उचलावीत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भावेश कारेकर यांची शासनाकडे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 07/Mar/2025