मंडणगड : गावभेटीला निघाली ग्रामदेवतेची पालखी

मंडणगड : फाल्गुन शुद्ध पंचमीपासून म्हणजेच फाक पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. ४ मार्चला पारंपरिक पद्धतीने होळ्या आणून त्याचे पूजन केले असून ५ मार्चपासून ग्रामदेवतांच्या पालख्या ढोलताशांच्या गजरात गावभेटींना निघाल्या आहेत.

तालुक्यात सार्वजनिक १०५, खासगी २३५ होळ्या पेटवण्यात आल्या. गावांतून ग्रामदेवतांच्या पालख्या गावभेटींना बाहेर पडल्या आहेत. फाक पंचमीच्या मुहूर्तावर विविध गावांत शेवराचे झाड तोडून त्याची होळी उभी करण्यात आली. सलग दहा दिवस या होळीची पूजा करून त्याच्या भोवती होम पेटविण्यात येणार आहे. या उत्सवात होळी पेटवण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा उत्साह दांडगा असतो. या होळीच्या होमात एकमेकांमधील वैर जाळून टाकावा, अशी अपेक्षा असते तर याचवेळी हवेतील गारठा जाऊन वातावरणातील तापमान हळूहळू वाढू लागते. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाला मोठे महत्त्व असते.

लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या शेवरे-पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात. या खेळ्यांसोबत गावागावातील फिरणारे संकासूर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करतो. होमात नवीन जोडप्यांनी नारळ टाकून पुढील संसारासाठी आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या सहाणेवर आणल्या जाणार आहेत. सहाण भरण्याच्या ठिकाणी गावागावांत जत्रेचे रूप येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 06/Mar/2025

Arihant 1