चिपळूण : वालोपे रेल्वेस्थानकातून ५० हजार किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या दुचाकी चोरीप्रकरणातील चोरट्याच्या चिपळूण पोलिस गुन्हे अन्वेषण पथकाने सावर्डे रेल्वेस्थानक येथून मुसक्या आवळल्या. हा चोरटा मुळचा विजापूर येथील असून तो काही वर्षे चिपळूण येथे वास्तव्यास होता.
मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. परशुराम उर्फ (रामा) सिंधु सुतार (२५, विजापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चिपळूण रेल्वे स्टेशन ठिकाणी ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत मोहन गोविंद पांचाळ (५९, आंबडस, खेड) यांनी दुचाकी पार्किंग करून ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली. त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला होता. या चोरीच्या घटनेचा तपास सुरु असताना अशातच चिपळूण पोलिस गुन्हे अन्वेषण पथकाने तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काठी महत्वाचे धागेदोरे हाती लागले.
त्याआधारे या पथकाने तपास यंत्रणेत कमालीची गती आणली. एकीकडे चोरी तपास सुरु असताना परशुराम (रामा) सुतार हाच मुख्य चोरटा असल्याचे स्पष्ट झाले. तो सावर्डे रेल्वेस्थानकातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने थेट रेल्वेस्थानक गाठून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. परशुराम सुतार याला अटक करण्यात आली असून ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा वराडे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 06/Mar/2025














