संगमेश्वर : संगमेश्वर देवरुख राज्यमार्गावर बुरंबी येथे अरुंद पुलाजवळच गेले पंधरा दिवस खाजगी केबल टाकणाऱ्या कंपनीने रस्त्याच्या अर्ध्या भागात मातीचा ढिगारा टाकून ठेवल्याने येथे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख, या रस्त्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बुरंबी येथील अरुंद पुलानजीक गेले पंधरा दिवस रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत मातीचा ढिगारा टाकून ठेवण्यात आला असून यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच येथील पूल अरुंद असल्याने दोन मोठी वाहने एकाच वेळी पुलावरून जाऊ शकत नाहीत. पुलाच्या पलीकडे माध्यमिक शाळा असल्याने या मार्गावर विद्यार्थ्यांची सतत जा ये सुरू असते. खाजगी केबल टाकणाऱ्या कंपनीने मातीचा ढीग रस्त्यात टाकताना एका बाजूला पाच फुटांचा चर खोदून ठेवला आहे. या दोन्ही गोष्टी अत्यंत धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अपघात घडण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांसह वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.
बुरुंबी येथे अरुंद पुलाजवळ गेले पंधरा दिवस जो मातीचा ढीग टाकून ठेवला आहे, तो तातडीने न उचलल्यास याच ठिकाणी रास्ता रोको सारखे आंदोलन करावे लागेल. याबरोबरच येथे अपघात घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी खाजगी केबल टाकणारी कंपनी आणि देवरुख सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर टाकली जाईल असा इशारा परशुराम पवार यांनी दिला आहे.
बांधकाम विभागा विरोधात निवेदन देणार
खाजगी कंपनीकडून केबल टाकताना गाईड स्टोन उखडून टाकणे, अंतर दाखवणारे दगड गटारात फेकून देणे, साईड पट्टीची वाताहत करणे, केबल टाकताना मातीचे ढीग रस्त्यात टाकून ठेवणे, केबल टाकून झाल्यानंतर साईड पट्टीची समपातळी न करणे, ऐन उन्हाळ्यात झाडे लावणे, लावलेली झाडे करपून जाणे याबाबत देवरुख येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या जबाबदाऱ्या टाळत असल्याने बांधकाम विभागा विरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच बांधकाम विभागाच्या सचिवांकडे आपण निवेदन देणार असल्याची माहिती प्रवासी संघटनेचे पदाधिकारी परशुराम पवार यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 06/Mar/2025














