चिपळूण : चिपळूण तालुक्यासह शहर परिसरात जुगार, मटका फोफावला आहे. ठिकठिकाणी चौकाचौकात आणि नाक्यावर खेळला जात आहे. पोलिसांमार्फत तकलाद कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतर पुन्हा संबंधित व्यावसायिक आपले बस्तान मांडत आहेत. काही ठिकाणी जुगाराचा अड्डा किंवा क्लबदेखील चालविला जात आहे. याकडे पोलिस डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.
चिपळूण शहर परिसरासह सावर्डे, अलोरे या भागात जुगाराचे अड्डे चालविले जात आहेत तर काही टपऱ्या-टपऱ्यांवर मटका जुगार लावला जात आहे. ऑनलाईन पद्धतीने देखील हा जुगार सुरू असून अनेकजण त्याला बळी पडत आहेत. शहरातील पानगल्ली, चिंचनाका, बहादूरशेख चौक, खेर्डी, भेंडी नाका यासह सावर्डे, अलोरे या भागात मोठ्या प्रमाणात जुगार चालविला जात आहे. या शिवाय मटका देखील राजरोसपणे सुरू आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून अनेक अवैध धंदे ठिकठिकाणी सुरू आहेत. अनेक ठिकाणी गावठी दारू बेकायदेशिररित्या विकली जात आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून फुटकळ कारवाई करण्यात येते.
मात्र, धगधगणाऱ्या हातभट्ट्या तशाच धगधगत आहेत. गावठी दारू विकणाऱ्यांवर क्षुल्लक कारवाई करून २५०-३०० रुपयांची दारू जप्त केल्याची कागदोपत्री कारवाई केली जात आहे व अशा केसेस मोठ्या प्रमाणावर करून आपण गावठी हद्दपार करीत आहोत, असे भासविले जात आहे. यामुळे ठिकठिकाणी राजरोसपणे गावठी दारुची देखील विक्री सुरू आहे. असाच प्रकार मटका व जुगाराचा सुरू असून चार-आठ दिवसांनी मटका अनुधावर फुटकळ कारवाई करण्यात येत आहे.
मोठी कारवाई…
शहरातील गांधी चौक पानगल्लीजवळ जुगार अड्ड्यावर धाड टाकून चिपळूण पोलिसांनी तब्बल ५३० रूपयांची रोख रक्कम व मटका, जुगाराच्या साहित्यासह एकूण ५४५ रूपयांचा ऐवज जप्त केला असून चिपळुणात मोठी छापा टाकला आहे. या प्रकरणी मुनवरमियाँ राजूमियाँ जमादार (७०, रा. अलोरे मच्छी मार्केट) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ५ मार्च रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधिताने कल्याण मटका नावाने ओळखल्या जाणाऱ्या मटका जुगारासाठी लोकांकडून बेकायदा पैसे जमवून जुगार खेळताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी साहित्यासह रोख रक्कम जप्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 07/Mar/2025














