हृदयविकारावर ‘ईसीजी मशीन’द्वारे रत्नागिरीत होणार जलद उपचार

रत्नागिरी : हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा टक्का दिवसेंदिवस बाडू लागला आहे. अगदी कमी वयोमानात या विकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या बाढत आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी आता आरोग्य विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘स्टेमी’ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६८ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशीन देण्यात आले आहे. यावर तपासणी केल्यावर अगदी दोन मिनिटांत त्या रुग्णाला माहिती मिळणार आहे. जर लक्षणे सापडले तर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्ह्यातील ३ मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला किंवा रक्त पुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये अडथळा निर्माण झाला की हृदयविकाराचा झटका येतो. विशेषतः हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा टप्पा वाढला आहे. वयोमान कमी झाले आहे. हृदयविकाराने होणारे मृत्यू काही प्रमाणात रोखण्यासाठी ‘स्टेमी’ हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्राला व ग्रामीण रुग्णालयाला ईसीजी मशिन देण्यात आली आहे. यासर्व ठिकाणी मोफत तपासणी केली जाणार आहे.

हृदयविकाराचे लवकर निदान करणे, रुग्णांना तातडीने थ्रोम्बोलायसिस आणि अँजिओप्लास्टीसारखे उपचार उपलब्ध करणे, हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी करणे हे या योजनेचे उद्देश आहेत. जिल्हास्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्टेमी उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये ईसीजी मशीन, थ्रोम्बोलायसिसची औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाते, जिथे अँजिओप्लास्टीची सोय उपलब्ध आहे. रुग्णांना जलद आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका सेवा आणि टेलिमेडिसिनचा वापर केला जातो.

स्टेमी ‘हब’ आणि ‘स्पोक’ मॉडेल
मोठे आणि सुसज्ज हॉस्पिटल ‘हब’ म्हणून काम करतात, तर लहान रुग्णालये जसे की ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘स्पोक’ म्हणून काम करतात. जेव्हा एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा त्याला जवळच्या ‘स्पोक’ रुग्णालयात नेले जाते. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जातात आणि ‘हब’ हॉस्पिटलमधील तज्ञांशी संपर्क साधला जातो. ‘हब’ हॉस्पिटलमधील डॉक्टर रुग्णाची माहिती आणि ईसीजी रिपोर्ट पाहून पुढील उपचार ठरवतात. आवश्यक असल्यास, रुग्णाला तातडीने ‘हब’ हॉस्पिटलमध्ये हलवले जाते, जिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टीसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात.

या’ ठिकाणी होणार उपचार
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परकार हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, बीकेएल वालावलकर हॉस्पिटल व लाईफ केअर चिपळूण या आरोग्य संस्था हब म्हणून कार्यरत आहेत. येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदय विकारावर उपचार केले जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 07/Mar/2025