चिपळूण : गोवळकोट-पेठमापची ग्रामदेवता श्री करंजेश्वरी देवीचा ११ पासून शिमगोत्सव

चिपळूण : गोवळकोट-पेठमाप येथील ग्रामदेवता श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा शिमगोत्सव. ११ ते १४ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. विशेष म्हणजे हा गुलाल मुक्त शिमगा असतो. यावर्षी शेरणोत्सव १३ मार्च रोजी होणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली आहे. ११ मार्च रोजी दु. ३ वा. गोवळकोट येथील मंदिरातून पालखी प्रस्थान करील व शिमगोत्सवास प्रारंभ होईल. यानंतर गोविंदगडावर पालखी जाईल व तेथे श्री देवी रेडजाईची भेट, श्री जगताप कुटुंबियांची मानाची आरती, यानंतर पेठमापकडे पालखी निघेल. दि. १२ मार्च रोजी सकाळी ८ वा. पेठमाप सहाणेवर आगमन होईल. सायंकाळी ५ वा. भक्तीगितांचा कार्यक्रम अमोल पटवर्धन व सहकारी सादर करतील.

त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून भक्तगणांची शेरणे स्वीकारली जातील. रात्री ८ वा. महाआरती व ११ वा. वसंत वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल. दि. १३ रोजी सायंकाळी ४ वा. पेठमाप येथे वाशिष्ठी नदीपात्राजवळ शेरणोत्सव कार्यक्रम होईल. यानंतर पालखी बाजार पुलाच्या दिशेने जाईल. रात्री १० वा. पालखी गोवळकोटकडे प्रस्थान करेल. दि. १४ रोजी सकाळी ७वा. गोवळकोट येथे भद्री होम लागेल. सायंकाळी ५ वा. गोवळकोट सहाणेवरून पालखी मिरवणुकीने श्री करंजेश्वरी मंदिराकडे जाईल व रात्री ८ वा. शिमगोत्सवाची सांगता होईल. या शिमगोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 07/Mar/2025

Ratnagiri Khabardar add image