संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेतील पूरग्रस्त गेल्या ४० वर्षांपासून वंचित आहेत. येथील व्यापाऱ्यांच्या मालकीचे स्वतंत्र सातबारे करण्याचे काम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या सहकायनि लवकरच पूर्ण करू, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले.
संगमेश्वर बाजारपेठेतील पूरग्रस्तांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी डॉ. अमित ताठरे, विवेक शेरे, विनोद म्हस्के, उदय संसारे, अभय गद्रे, प्रतीक देसाई, रमेश झगडे, अनिल भिडे उपस्थित होते. ते म्हणाले, १९८३ मध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण संगमेश्वर बाजारपेठजवळील रामपेठ भाग पाण्याखाली गेला होता. त्यामध्ये स्थानिकांचे प्रचंड नुकसान झाले. तत्कालीन प्रशासनाने पूरग्रस्तांच्या १९८४ साली मालकी हक्काची किंमत भरून दुकानदार व रहिवासी यांना भूखंडाचे वाटप केले.
या गोष्टीला चाळीस वर्षे पूर्ण होऊनही पुनर्वसित भागांमध्ये म्हणावे तशी सुधारणा आणि आवश्यक गोष्टींची उभारणी झालेली नाही. तसेच मालकी हक्काची किंमत देऊनही पूरग्रस्तांच्या नावे स्वतंत्र सातबारा प्रशासनाने दिलेले नाहीत. महापुरामुळे अगोदरच आर्थिक आणि मानसिक हतबल झालेल्या संगमेश्वरमधील प्रत्येक नागरिक बँकेचे अर्थसाहाय्य न मिळू शकल्याने स्वतःचे हक्काचे घर उभे करू शकले नाहीत. ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ होते तेच काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनी आपली घरे उभी केली. भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना एकत्र आणले. त्यांनी दाद मागायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात चर्चा झाली. त्या वेळी मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना फोनवरून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वामित्व योजनेंतर्गत भूखंडधारकांना स्वमालकीचे सातबारे करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबत निर्णय करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 07/Mar/2025












