रत्नागिरी : राज्य धनुर्विद्या स्पर्धेत जिल्ह्यातील १३०० खेळाडूंचा सहभाग

सावर्डे : महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा असोसिएशन आयोजित गुरुवर्य कै. संजय दिनकर झोरे यांच्या स्मरणार्थ १६ वी मिनी व पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत ३५ जिल्ह्यांतून १३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अॅकॅडमीच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा झाल्या.

या स्पर्धेवेळी मिशन ऑलिंपिक सदराखाली खेळाडूंना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले. फिजिओथेरपिस्ट मानसी बोरसाले, सुमित आमलेकर व वैभव पवार या तज्ज्ञांनी खेळाडूंना आहार, व्यायाम याबद्दल माहिती दिली. तसेच सर्वात लहान वयातील अर्जुन अॅवॉर्ड विजेती आदिती स्वामी, वर्ल्ड चॅम्पियन प्रथमेश जावकर व आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट शर्वरी शेंडे या खेळाडूंनी आपल्या जिल्हास्तरीय स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला याबाबत सर्व खेळाडूंना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

या स्पर्धा इंडियन, रिकर्व्ह व कंपाऊंड या तीन प्रकारात दहा, तेरा व पंधरा वर्षे मुला-मुलींच्या गटांमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उ‌द्घाटनप्रसंगी सावर्डे येथील पोलिस उपअधीक्षक भागोजी औटी, सावर्डे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर, तसेच एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अॅकॅडमीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, राजेंद्र चव्हाण व जिल्हा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश साळवी उपस्थित होते. औटी यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 07/Mar/2025