खेड : जगबुडी गणेश विसर्जन घाटावर परप्रांतियांचं बस्तान

खेड : शहरातील जगबुडी नदीकिनारी लाखो रुपये खर्चुन गणेश विसर्जन घाट उभारला आहे. विरंगुळ्यासाठी नागरिकांची गणेश विसर्जन घाटावर रेलचेल सुरू असते. मात्र सद्यस्थितीत येथे परप्रांतियांनी बस्तान ठोकले आहे. यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे.

जगबुडी नदीकिनारी आधीच वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांमुळे परिसर अस्वच्छ होत आहे. या रहिवाशांना तेथे वास्तव्या करण्यास नेमकी परवानगी दिली कोणी, याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. या रहिवाशांकडून बऱ्याचवेळा शाब्दिक वादाचे प्रसंग घडत ते हाणामारीपर्यंत जात असल्याच्या घटनाही घडत आहेत.

यातच आता गणेश विसर्जन घाटावर बस्तान ठोकणाऱ्या परप्रांतियांची भर पडली आहे. सद्यस्थितीत येथे ७ ते ८ कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांकडून परिसर अस्वच्छ केला जात असून सर्वत्र दुर्गंधीही पसरली आहे. कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बस्तान ठोकणाऱ्या परराज्यातील नागरिकांना विचारणा करण्याची तसदी नगरप्रशासनाकडून घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे नागरिक नेमके कुठून आलेत, किती दिवस वास्तव्य करणार यासह त्यांची तपशीलवार माहिती घेणे आवश्यक असतानाही त्याकडे नगरप्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 07/Mar/2025