रत्नागिरी : राजाभाऊंचा सत्कार करताना मला धन्य झाल्यासारखे वाटते आणि माझाच सत्कार झाल्याचे समाधान मिळते. राजाभाऊंसारखे निर्मळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्व आता पाहायला मिळत नाही.
त्यांनी रसिकांच्या रूपाने उदंड संपत्ती मिळवली आहे, अशा शब्दांत तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी कोकणगंधर्व राजाभाऊ शेंबेकर यांचा गौरव केला.
कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील लोकप्रिय गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल चाहत्यांकडून ‘स्वराधिराज’ ही पदवी देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. येथील मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला असलेली रसिकांची तुडुंब गर्दी त्यांना मिळालेल्या लोकाश्रयाची साक्ष देत होती. पं. तळवलकर यांच्या हस्ते शेंबेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी सौ. वनिता यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी तालयोगी पं. तळवलकर यांच्यासह पं. मुकुंद मराठे, कीर्तनसूर्य ह. भ. प. श्रीपादबुवा ढोल्ये, संध्या सुर्वे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. अजय जोगळेकर, गायक प्रसाद गुळवणी आदींसह संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजाभाऊंच्या कारकिर्दीचा पट उलगडणारे अनिल दांडेकर यांनी लिहिलेले मानपत्र त्यांना देण्यात आले. त्या मानपत्राचे वाचनही करण्यात आले. चाहत्यांनी गोळा केलेली एक लाख ५१ हजार १११ रुपयांची थैलीही राजाभाऊंकडे सुपूर्द करण्यात आली.
राजाभाऊंनी ज्यांना गुरू मानले, त्या पं. राम मराठे यांचे सुपुत्र पं. मुकुंद मराठे यांनी राजाभाऊंची एसटीतील नोकरी आणि गायनकला यांच्यातील साम्यस्थळे दर्शवली.
तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते राजाभाऊंचा सन्मान होणे ही भाग्याची गोष्ट असल्याची भावना कीर्तनसूर्य ह. भ. प. श्रीपादबुवा ढोल्ये यांनी व्यक्त केली. पं. तळवलकर यांच्या काही आठवणीही त्यांनी सांगितल्या.
राजाभाऊंची आदित्य ओक यांनी घेतलेली मुलाखत पाहून भारावून गेल्याची भावना तालयोगी पं. तळवलकर यांनी व्यक्त केली.
सन्मान स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना राजाभाऊ शेंबेकर यांनी हा आपल्या जीवनातला अपूर्व योग असल्याचे सांगून, सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच सर्वांच्या ऋणात राहण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ही पदवी स्वीकारण्याच्या योग्यतेचा मी आहे की नाही असा प्रश्न माझ्या मनात आला. शेंबेकर आणि चितळे या दोन्ही घराण्यांतून विद्यार्थीवृत्तीचा वारसा मिळालेला मी अतृप्त विद्यार्थी आहे. पं. राम मराठे यांचा प्रभाव माझ्यावर आहे. चिपळूणच्या अक्कलकोट स्वामी मठात होणाऱ्या भजनांचे संस्कार माझ्यावर लहानपणापासून झाले. आईमुळे ऐकण्याची सवय लागली. वडील, काका यांचे गाणे सतत कानावर पडत होते. आजोळच्या म्हणजे चितळे कुटुंबीयांकडून उत्तेजन मिळत होते. पं. राम मराठे, पं. छोटा गंधर्व यांच्या गायकीचे एकलव्याप्रमाणे अध्ययन करण्याचा प्रयत्न केला.
महेंद्र पाटणकर आणि निबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजाभाऊंचे शिष्य वरद केळकर यांनी सादर केलेल्या मधुवंती रागातील गायनाने झाली. त्यांना श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) आणि प्रथमेश देवधर (तबला) यांनी साथसंगत केली. संध्या सुर्वे यांनी आटोपशीर प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. राजाभाऊंच्या गायकीची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतानाच त्यांनी राजाभाऊंचे वेगळेपण सांगितले. अमित ओक आणि हर्षल काटदरे या शिष्यांनीही राजाभाऊंबद्दल मनोगत व्यक्त केले. आनंद पाटणकर यांनी आभारप्रदर्शन केले. स्वराधिराज राजाभाऊंच्या गायनाने या कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 07-03-2025














