विलास रहाटेंची कला मार्गदर्शक म्हणून सलग तिसऱ्या वर्षी निवड

रत्नागिरी : देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांची मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाच्या ‘फाइन आर्ट’ प्रकारांसाठी मार्गदर्शक म्हणून सलग तिसऱ्या वर्षी निवड झाली आहे. ३८वा अखिल भारतीय विद्यापीठ आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव अमिटी विद्यापीठ (नॉएडा, उत्तर प्रदेश) येथे सुरू झाला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कला मार्गदर्शक म्हणून विलास रहाटे यांच्यासोबत केशर चोपडेकरही या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यापीठाचे दुसरे कला मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले आहेत.

एका शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव आणि राष्ट्रीय युवा महोत्सव अशा तीन टप्प्यांमध्ये सांस्कृतिक व कलाविषयक स्पर्धा आयोजित केल्या जातात. श्री. रहाटे गेली दोन वर्षे आणि आता २०२४-२५ अशी सलग तीन वर्षे मुंबई विद्यापीठासाठी कला मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडत आहेत. श्री. रहाटे व त्यांचे सहकारी श्री. चोपडेकर मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी ऑन द स्पॉट पेंटिंग, मेंदी, कोलाज, क्ले मॉडलिंग, स्पॉट फोटोग्राफी, रांगोळी, कार्टूनिंग, मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन), पोस्टर मेकिंग या कलाप्रकारांबरोबर प्रत्येक स्पर्धेच्या शुभारंभी असणाऱ्या शोभायात्रेतील चित्रकृती, वेशभूषा आणि रंगभूषेसाठी मेहनत घेतात.

रहाटे यांनी विद्यार्थी म्हणून आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून सहभागी होऊन मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव आणि राष्ट्रीय युवा महोत्सवात रांगोळी, पोस्टर मेकिंग,क्ले मॉडेलिंग, कोलाज आणि मांडणीशिल्प अशा कलाप्रकारात चमकदार कामगिरी करून अनेक पदके प्राप्त केली आहेत. त्यांना विद्यार्थी म्हणून २०१९ मध्ये नॅशनल चॅम्पियनशिपसाठी मुंबई विद्यापीठाने ‘विशेष कौतुक पुरस्कार’ बहाल केला होता, तर सन २०२१ मध्ये जगातील सर्वात लहान ३ सें.मी. X ३ सें.मी. आकारातील छत्रपती शिवरायांची रांगोळी साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक, एशिया व लिम्का बुकमध्येही स्थान प्राप्त केले आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. २०२३ मध्ये पंजाब विद्यापीठातील इंटरनॅशनल युथ फेस्टिवलमधील रांगोळी कला प्रकारात सुवर्णपदकाचा सन्मान प्राप्त केला होता. २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट ललित कला पुरस्कार’, २०२५ मध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार, तसेच केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते सन्मान झाला होता. रहाटे यांच्या रांगोळी कलेचे कौतुक मान्यवरांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 07-03-2025