राजापूर : पूर्व तालुक्यातील पाचल-तळवडेदरम्यान जोडणाऱ्या जीर्ण पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याबाबत केलेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर अर्जुनेला आलेल्या महापुरात त्या पुलाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली असली तरीही अखेरची घटका मोजत असलेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल बांधणे आवश्यक आहे.
दरवर्षी पावसाळ्यात होत असलेल्या अतिवृष्टीनंतर कमी उंची असलेल्या पाचल-तळवडे पुलावरून अर्जुनेच्या पुराचे पाणी वाहते. त्यामुळे वाहतूक प्रदीर्घकाळ बंद असते. परिणामी, पाचलशी वाहतुकीचा संपर्क तुटतो. हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. २०२१ ला सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. त्या वेळी अर्जुना नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडवला होता.
त्याचा पाचल तुळवडे पुलाला मोठा दणका बसला होता. महापुरातून वाहून आलेल्या लोकडांचे मोठमोठे ऑडके आदळल्यामुळे पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले तर पुलावर मोठमोठे खड्डे पडले. या प्रकारामुळे पुलाचा काही भाग खचला. त्यामुळे पाचलकडून तळवडे, ताम्हाणेसह जामदा परिसराकडे जाणारी वाहतूक बंद पडली. पूल खचल्याने वाहतुकीसाठी तो काही दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. या पुलाची तात्पुरती डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. विवराप्रमाणे पडलेले मोठे खड्डे बुजवण्यात आले. त्यानंतर पूल वाहतुकीस खुला करण्यात आला.
या पुलाची लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहाणी करत त्या जागी नवीन उंच पूल बांधण्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार येथील बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे चार कोटी अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्यात आला आणि तो शासनाला सादर करण्यात आला होता.
पावसाळ्यात पुलाची स्थिती बिकट
अर्जुना नदीला येणाऱ्या महापुरामुळे पाचलचा संपर्क तुटतो. पाचल मोठी बाजारपेठ असल्यामुळे दररोज सुमारे ५० ते ६० गावांतील ग्रामस्थ अवलंबून असतात. हे ग्रामस्थ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसह आठवडा बाजार, आरोग्यसेवा, शिक्षण यासाठी पाचलवर विसंबून आहेत. त्यामुळे पाचल तळवडेला जोडणाऱ्या जुन्या पुलाच्या जागी उंच स्वरूपातील नवीन पूल बांधणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशासकीय पातळीवरून चार कोटींचे अंदाजपत्रक बनवण्यात आले होते. सरत्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे अर्जुनला येणाऱ्या पुरावरसुद्धा परिणाम झाला होता. पावसाळा सुरू व्हायला तीन महिने बाकी आहेत. रखडलेल्या पुलाचा प्रश्न निदान या वेळी तरी मार्गी लागणे अपेक्षित आहे. यावर्षी पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्यास पावसाळ्यात अर्जुनेच्या महापुरात या पुलाची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 08/Mar/2025














