रत्नागिरी : मंदिरे वाचवा, देश वाचवा, हिंदूंनो, देवराईच्या सात-बारा उताऱ्यांमध्ये फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, देवराई जमिनींचा मालकी हक्क हिरावून घटनादत्त हक्काचा भंग करणाऱ्या प्रशासनाचा निषेध अशा घोषणा देत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे काल जयस्तंभ परिसर दणाणून सोडला, देवराईच्या जमिनी देवस्थानाच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
हिंदू मंदिरांचे विश्वस्त, भाविक, हिंदू मोठ्या संख्येने या वेळी सहभागी झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मंदिराच्या रक्षणासाठी संघटित व्हा, मंदिराच्या मालमत्तेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य, मंदिरे वाचवा, हिंदू संस्कृती वाचवा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी म्हणाले की, कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीररीत्या कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे देवराई तथा देवरहाटी जमिनी या देवस्थानांच्या नावावर पूर्ववत कराव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात देवराई तथा देवरहाटी असून, ते धार्मिक महत्त्व असलेले पवित्र उपवन असते. या देवराई या त्यामधील स्थापित असलेल्या देवांच्या नावावर असतात. या जमिनी पारंपरिक स्वरूपात देवस्थानांच्या अधिपत्याखाली असून, त्या धार्मिक व सांस्कृतिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा स्थानिक जनतेची कोणतीही समुपदेशन प्रक्रिया न करता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन झाले असून, याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
देवराई पर्यावरणासाठी आवश्यक
देवाच्या जंगलातील म्हणजे देवराई तथा देवरहाटीतील झाडे कोणीही तोडत नाही. तसेच, या सर्व जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत. अनेक वर्षांपासून जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि परंपरा जपल्या जात होत्या; परंतु या जागा शासनाच्या नावावर झाल्यामुळे ग्रामस्थ, भक्तही दुखावले गेले आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 11/Mar/2025














