लाडकी बहिण योजनेतील नवे अर्ज नाकारले : मुराद अडरेकर

चिपळूण : राज्यातील महिलांना मोठा आधार ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची तक्रार त्यांनी थेट राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. त्यानुसार महिलांना प्रतिमहिना पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या रकमेत वाढ होऊन दरमहा २१०० रुपये दिले जातील, असे आश्वासन महायुतीने दिले होते; मात्र सरकारी तिजोरीवरचा वाढता बोजा पाहून निवडणुकीनंतर या योजनेचे काही
निकष कडक करून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महायुती सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी योजनेबाबतचा नवा प्रकार पुढे आणत महिला व बालविकास विभागाचे आयुक्त यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास चिपळूण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे.

यामुळे अनेक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. अर्ज नाकारण्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिले जात नाही. शासनाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. या प्रकरणात तातडीने लक्ष घालून स्थानिक प्रशासनाला अर्ज स्वीकारण्याच्या सूचना द्याव्यात तसेच, या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अडरेकर यांनी केली आहे.

Tata aeris

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 12/Mar/2025