खेड : जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झाली आहे; मात्र या नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला दररोज येणारी भरती-ओहोटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.
खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या चार दिवसांपासून सुरवात झाली आहे. त्याच ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवर अनेक मगरींनी आपला कब्जा केलाय तर दुसरीकडे भरती-ओहोटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात पसरत असल्यामुळे या नदीतील कोट्यवधी रुपये खर्चुन गाळ काढणाऱ्या जलसंपदा विभागासमोर आता पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
खेड शहराला सतत पुराचा धोका खेडमधील जगबुडी नदीमुळे निर्माण होतो. कित्येक दिवस खेड शहरात पुराचे पाणी शिरते आणि शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार, गेल्या वर्षी २०२४ ला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी २ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले. पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवस काम झाले आणि त्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागामार्फत सुरवात झाली आहे.
कामाला सुरवात झाल्यानंतर नदीतील उपसलेला गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले; मात्र नदीतील उपसलेले गोटे, वाळू आणि खडक नेण्यासाठी एकाही शेतकऱ्याने अजून प्रतिसाद दिला नाही.
पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना तेवढ्या शीघ्र गतीने गाळ काढण्याच्या कामाला सुरवात होणे अपेक्षित आहे; मात्र दोन पोकलेन मशिनद्वारे नदीपात्रातच गाळ साचून ठेवला जात आहे. त्यातच आता दररोज येणारी भरती-ओहोटी नदीपात्रात साचून ठेवलेल्या गाळांच्या ढिगाऱ्यांवर नदीतील महाकाय मगरींनी कब्जा केल्याने गाळ काढण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. एक-दोन नाहीतर अनेक मगरी या गाळावर येऊन बसल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 12/Mar/2025














