HSC Exam : 12 वी परिक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक, मुलांच्या मार्क्सचं काय? बोर्डाने दिले स्पष्टीकरण..

नवी मुंबई : HSC Exam | विरारच्या बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शिक्षिकेच्या घरात आग लागून 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या. विरारमध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने उत्तर पत्रिका तपासण्यासाठी घरी आणल्या होत्या, मात्र सोमवारी घरात लागलेल्या आगीत उत्तर पत्रिकेचा गठ्ठा जळून खाक झाला.विरार पश्चिममधील आगाशी येथे राहणाऱ्या शिक्षिकेने बारावी कॉमर्स या विषयाचे पेपर घरी तपासण्यासाठी आणले होते. साधारण 175 च्या आसपास हे पेपर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद करून घेतली आहे, तसंच पेपरसंदर्भात बोर्डाकडे पाठपुरावा सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे, पण पोलीस तसंच शिक्षिकेने कॅमेरासमोर बोलायला नकार दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या मार्कचं काय? बोर्डाची प्रतिक्रिया
दरम्यान या सगळ्या प्रकरणावर बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, कारण मंडळाकडून पेपर अलॉटमेंट करून ते संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे पाठवले गेले होते. मंडळ नियमावलीनुसार हे पेपर कनिष्ठ महाविद्यालयातच तपासणे गरजेचे होते, मात्र तसं न करता पेपर घरी घेऊन जाण्यात आले, त्यामुळे ही घटना घडली आहे, अशी प्रतिक्रिया बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

हे पेपर आधीच एक्झामिनेरने तपासले आहेत, त्यामुळे त्याचं गुणदान झालेलं आहे. पेपरचे गुणदान झालं असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांना जे गुण मिळाले आहेत, ते त्यांना दिले जातील, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

तसंच यामध्ये जे दोषी शिक्षक अथवा प्राचार्य असतील त्यांच्यावर मंडळ नियमानुसार कारवाई करण्यात येईल. प्रथमदर्शनी गोपनियतेचा भंग झाला असल्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात येणार आहे, त्यासाठी मंडळाचे प्रतिनिधी पाठवले जातील, अशी प्रतिक्रिया बोर्डाने दिली आहे. तसंच शिक्षकांनी मंडळाच्या नियमानुसार पेपर महाविद्यालयातच तपासणे आवश्यक आहे. सर्व शिक्षकांनी आणि प्राचार्यांनी या नियमाचं कटाक्षाने पालन करावं, असं आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आलं आहे.

Happy journey marathi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 14-03-2025