चिपळूण शहरात वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या २८ घटना

चिपळूण : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे आतापर्यंत २२५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठी आहे. शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये रस्त्याने चालणाऱ्या लहान मुलांवर आणि वयोवृद्ध लोकांवर भटकी कुत्री हल्ला करतात. संध्याकाळी ज्या ठिकाणी चायनीजच्या गाड्या लागतात त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असतो.

शहरातील शाळांच्या परिसरात ही कुत्री मोकाट फिरत असतात. बहादूरशेख नाका येथील वडार कॉलनीत काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी चौघाजणांना इजा पोहोचवली होती. परशुराम नगर परिसरात ही कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एक वयोवृद्ध महिला जखमी झाली होती. वर्षभरात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या २८ घटना घडल्या आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध लोकांचा समावेश आहे. रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बघून कुत्री भुंकत असतात. त्यामुळे घाबरलेले विद्यार्थी कुत्र्यापासून वाचण्यासाठी धावतात. अशावेळी अपघात होतो आणि विद्यार्थी जखमी होतात. असे प्रकारही शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या परिसरात घडले आहेत.

नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी शांत आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या विषयावर कोणीही बोलत नाही; मात्र पालिकेने लोकांची खबरदारी घेत कुत्र्यांची नसबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका एजन्सीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. एजन्सीचे काही लोक वाहन, डॉक्टर आणि इतर साहित्य घेऊन शहरात फिरतात. भटकी कुत्री आढळल्यानंतर त्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाते.

चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर कमी झाला आहे. आम्ही खासगी एजन्सीमार्फत कुत्र्यांचे निर्बीजीकरण करत आहोत; परंतु कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना कुठेही भटक्या कुत्र्यांचा वावर आढळला, तर त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा. कुत्र्याने हल्ला केला असेल तर तत्काळ उपचार घ्यावेत आणि पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती पालिकेला द्यावी, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू- वैभव निवाते, आरोग्य विभागप्रमुख

पूर्वी चिकन आणि मटणच्या दुकानांसमोर भटकी कुत्री वावरायची. आता दुकानासमोर कुत्रे आले, तर आम्ही त्यांना हाकलतो. त्यामुळे आमच्या दुकानासमोर कुत्र्यांचा वावर कमी झाला आहे-फिरोज शेख, मटण व्यावसायिक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 17/Mar/2025