चिपळूण : चिपळूण ते गुहागर या मार्गावरील सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या या चिपळूण बाजारपेठेतूनच कराव्यात. गुहागरकडून येणाऱ्या सर्व बसेस बायपास मार्गे वळवण्यात येत आहेत. याचा नाहक त्रास दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. याबाबतचे निवेदन कोकण प्रवासी महासंघाच्या वतीने चिपळूण व गुहागर आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, चिपळूण आगारातून सुटणाऱ्या गाड्या या बाजारपेठेतून जात आहेत. मात्र, गुहागरच्या दिशेने येणाऱ्या सर्व गाड्या गुहागर बायपास मार्गे पॉवरहाऊसच्या दिशेने चिपळूण बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे गुहागर नाका, मच्छीमार्केट, जुना बसस्थानक येथे उतरणाऱ्या प्रवाशांना चिपळूण स्टॅण्डवर उतरून पायी चालत यावे लागत आहे. प्रसंगी रिक्षाला ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. महामंडळाच्या या आडमुठे धोरणामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गुहागर तालुका तसेच मार्गताम्हाणेपासून अनेक प्रवासी प्रवास करत असतात. तसेच या मार्गवरून अनेक गावे जोडलेली असून आजुबाजूच्या गावातून दररोज शेकडो प्रवासी ये-जा करतात. यातील ९० टक्के प्रवाशांची कामे ही गुहागर नाका, भानी मार्केट, बाजारपेठ, जुना एसटी स्टैंड या ठिकाणी असतात. या सर्व प्रवाशांना चिपळूण बसस्थानकात उतरून पायी चालत जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत. काही प्रवाशांना बाजारपेठ किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी ४० ते ५० रुपये रिक्षा भाडे द्यावे लागत आहे. कोकण प्रवासी महासंथ यावाक्त सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे असे सांगण्यात येत आहे. गेले ४ महिने रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. तरी एस. टी. महामंडळाने तात्काळ सर्व एसटी बसेस पूर्ववत कराव्यात अन्यथा सर्व प्रवाशांना घेऊन प्रसंगी आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही कोकण प्रवासी महासंघाने दिला आहे.
या निवेदनावर महासचिव संस्थापक वसंत भोसले, अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष दीपक शिरकर, कार्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, खजिनदार अविनाश चव्हाण, चिपळूण-रामपूर विभाग संपर्क दिलीप चव्हाण, गुहागर संपर्क दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी, सत्यवान महापुस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 24/Mar/2025














